ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या डॉ. कविता गित्ते-कराड यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
केज/प्रतिनिधी :
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केज येथील साने गुरुजी निवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता गीते-कराड यांची केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांची राष्ट्रीय स्तरावरील या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याने बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येत्या ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते डॉ. कविता गीते-कराड यांना हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील, विशेषतः ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळावी, त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची या सन्मानातून राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे.
डॉ. कविता गीते-कराड यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करताना केवळ वर्गातील अध्यापनापुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून घेणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, विविध स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मान्यवरांकडून अभिनंदन
डॉ. कविता गीते-कराड यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल राज्याचे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. कविता गीते-कराड यांच्या या यशामुळे बीड जिल्ह्याची मान पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर उंचावली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बीड जिल्ह्याचे खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे यांनी शुभेच्छा संदेशात सांगितले की,
ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्य अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे .
आपल्या समर्पित सेवाभाची, शैक्षणिक कार्याची व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदाची दखल घेत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी झालेली निवड बीड जिल्ह्यासाठी तसेच संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.असे कौतुक केले.
तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही राष्ट्रीय स्तरावरील शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल डॉ. कविता गीते-कराड यांचे स्वागत व अभिनंदन केले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या राष्ट्रीय सन्मानाबद्दल बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे अध्यक्ष अॅड. उद्धव अण्णा कराड, उपाध्यक्ष राजेश कापसे तसेच डॉ.कविता गीते-कराड यांचे सर्व सहकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन केले.
बीड जिल्ह्याचे खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे कौतुक करताना सांगितले की ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या आपल्या संस्थेतील नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर मिळालेला हा सन्मान असल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.
ग्रामीण शिक्षणासाठी प्रेरणादायी कार्य
साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण व ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी डॉ. कविता गीते-कराड यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्तेची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेशी जोडून त्यांच्यातील क्षमता विकसित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा, पर्यावरण संवर्धन, सामाजिक उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा आणि विविध स्पर्धांमध्येही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा केवळ डॉ. कविता गीते-कराड यांचा वैयक्तिक सन्मान नसून, साने गुरुजी निवासी विद्यालय, केज, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे शिक्षण आणि बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याने केज शहरासह बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रांतून डॉ. कविता गीते-कराड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण आणि ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी केलेल्या त्यांच्या कार्याला राष्ट्रीय सन्मान मिळाल्याने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या या मानाच्या सन्मानाबद्दल सर्वच स्तरातून डॉ. कविता गीते-कराड यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्याकविता भावी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.




















