*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!*
*चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु—पत्रकार बांधवांची मागणी*
===============================================
केज/प्रतिनिधी
केज पंचायत समिती कार्यालय,परिसरातील शहिद,स्वातंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची व चबुतऱ्यावर लावलेल्या अशोक चक्राची विटंबना होतय त्यामुळे या चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी अथवा संरक्षण लोखंडी कठाडा बसवण्यात यावा. अशी मागणी केज येथील
पत्रकार बांधवांनी केज पंचायत समितीचे गट विकासधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गट विकासधिकारी यांनी या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे पत्रकार बांधवांनी दिला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,केज शहर हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयाची सुसज्ज अशी भव्य इमारत आहे.या कार्यालयाच्या परिसरामध्ये सन-१९७३ मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मसर्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मरणार्थ श्री. किसन सदाशिव पाटील- मांगवडगाव,श्री.दगडू केशव महानुभाव-विडा,श्री.माणिक केशवराव पटाईत-विडा,श्री. शिवाजी देवराव पटाईत-
विडा,श्री.धोंडीराम पांडुरंग कावळे-बनसारोळा,श्री.विठ्ठल गोविंद देशपांडे-केज,श्री. निवृत्ती फकीरराव ढाकणे- सारोळा,श्री.मुरलीधर विश्वनाथ सोनार-विडा,श्री. नागनाथ अंबादास खिंडरे- धारूर,श्री.काशिनाथ रामकृष्ण धारूर या स्वतंत्र्य सैनिकांची नावे असलेली कोणशीला लावण्यात आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला “भारताचे संविधान प्रस्ताविका” ची कोनशीला लावण्यात आलेली आहे. या स्तंभावर अशोक चक्र देखील लावण्यात आलेले आहे.
भारताच्या स्वतंत्र्याच्या काळामध्ये या शहीद स्वतंत्र्य सैनिकांनी स्वतःचे बलिदान दिले असून काही स्वतंत्र्य सैनिकांनी कारावास भोगला आहे. यामध्ये त्यांचे मोठे मोलाचे योगदान आहे.
परंतु केज पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून येत आहे.फक्त २६ जानेवारी,१ मे,१५ ऑगस्ट आणि १७ सप्टेंबर दिवशी वर्षातून चार वेळा शहिद, स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची स्वच्छता करण्यात येते. व यावेळीच फक्त केज पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने माजी सैनिकाचा सन्मान करून दिखावा करण्यात येतो. परंतु शहीद,स्वतंत्र सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना होत असताना पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब संवेदनशील असताना देखील संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांना याचे गांभीर्य नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे. या चबुतऱ्यावर काही नागरिक, तळीराम हे पायातील बूट-चप्पल घालून या ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करून बसत आहेत. व मद्यपान करून नशेत चबुतऱ्यावर झोपत देखील आहेत. ही बाब प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांना पंचायत समिती कार्यालयात जाताना-येताना दिसत असताना देखील त्यांना याचे गांभीर्य नाही. हा चबुतरा म्हणजे आलेल्या गेल्यांचे विश्रांतीचे ठिकाण बनले असुन एक प्रकारे शहिदांच्या छाताडावरच तळीराम आपली झोपण्याची बसण्याची व्यवस्था करत आहेत.गेल्या अनेक वर्षापासून ही बाब पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास पत्रकार बांधवांनी आणून देऊन पत्रकार बांधवांनी या ठिकाणी शहिदांच्या स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना टाळण्यासाठी व पावित्र्य राखण्यासाठी लोखंडी तारेची जाळी अथवा संरक्षण कठडा करण्यात यावा. अशी विनंती वेळोवेळी केली असताना देखील आज रोजी पर्यंत संबंधितांनी दखल घेतलेली नाही. म्हणून केज येथील काही पत्रकार बांधवांनी गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांना दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन दिले आहे.
पंचायत समिती कार्यालयाची इमारत व सभापती, गट विकास अधिकारी व इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध होतो. परंतु देशासाठी शहीद झालेल्या व कारावास भोगलेल्या स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याचे पावित्र्य राखण्यासाठी निधी उपलब्ध नसतो ही किती गंभीर बाब आहे. यावरून दिसून येत आहे.
केज पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील शहिदांच्या, स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना होत असून तात्काळ लोखंडी तारेची जाळी अथवा संरक्षण कठडा करण्यात करण्यात यावा अशी गट विकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्याकडे केज येथील काही पत्रकार बांधवांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. जर या प्रकरणी गट विकास अधिकारी यांनी तात्काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
निवेदनावर पत्रकार तात्या गवळी, महादेव काळे, रमेश इतापे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय आरकडे, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय (पिंटू)ठोंबरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. माहितीस्तव या निवेदनाची प्रत सा.जि.प.बां.विभाग. पंचायत समिती केज यांना देखील देण्यात आली आहे.
—–चौकट——
*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याचे पावित्र संभाळण्याची जबाबदारी प्रशासनाचीच*
पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात स्वातंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना होत आहे. ही बाब योग्य नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलेले आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. व त्यांचा अवमान होऊ नये. म्हणून केज येथील पत्रकार बांधवांनी केलेली मागणी योग्य आहे. तात्काळ गटविकासधिकारी यांनी पत्रकारांच्या मागणीची दखल घ्यावी. पत्रकारांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार मी स्वतःया आंदोलनात सहभागी होणार आहे.
*—-माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे*




















