केज/प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केज तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८-०० वाजता वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. दिनेश पी.सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली निघणार आहे.
केज न्यायालय,केज तालुका वकील संघ व इंटरनॅशनल जस्टिस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८-०० वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय,केज येथे मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर या वॉकेथॉन रॅलीचा शुभारंभ होईल.
विविध सामाजिक विषयांवर होणार जनजागृती
या वॉकेथॉन रॅलीमध्ये बालमजुरी प्रतिबंध करणे,बालविवाह रोखणे,लैंगिक अत्याचारापासून सर्वांचे संरक्षण करणे, नागरिकांची जबाबदारी,अधिकार व कर्तव्ये,सर्वांना समान न्याय,शिक्षणाचा अधिकार आणि स्वातंत्र्य-शिक्षण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
या उपक्रमात न्यायाधीश,विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक,पोलीस प्रशासन,नगर पंचायत केज,तहसील कार्यालय केज, पंचायत समिती केज व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत.या वॉकेथॉन रॅलीमध्ये सर्व विद्यार्थी, नागरिक व संबंधितांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.दिनेश पी.सुराणा,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा.डॉ.वाहब ए.सय्यद तसेच केज न्यायालयाच्या वतीने करण्यात आले आहे.




















