केज/ प्रतिनिधी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ला अंबाजोगाई येथे मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक श्री महादेव अण्णा आदमाने यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे अंबाजोगाईच्या राजकारणात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे.
आमदार नमिताताई मुंदडा यांच्या कार्यशैलीने प्रेरित
केजच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या विकास-केंद्रित कार्यशैलीने प्रेरित होऊन, तसेच ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांना अंबाजोगाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण्याच्या ध्येयाने आदमाने यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
‘आई निवास’ येथे भव्य प्रवेश सोहळा
’आई निवास’ येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यात अक्षय भैय्या मुंदडा यांच्या नेतृत्वात महादेव अण्णा आदमाने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई नगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकवण्याचा आणि नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘पक्षासाठी पूर्ण निष्ठेने कार्य करीन’ – महादेव अण्णा आदमाने
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महादेव अण्णा आदमाने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी पुढील काळात पक्षासाठी पूर्ण निष्ठेने कार्य करीन. सर्व कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच क्रांती नगर,लालनगर या भागातील घरकुलासह इतर समाजपयोगी कामे मार्गी लावण्यासाठी आपण नंदकिशोर मुंदडा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या स्थानिक संघटनेला मोठी पोकळी निर्माण झाली आहे, तर भाजपची अंबाजोगाईतील राजकीय पकड अधिक मजबूत झाली आहे.





















