अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता पूर्ववत मोकळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात या निर्णयाचे स्वागत होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मौजे पाटोदा (म.) येथील गट क्र.३७२, ३७३,३७४,३७५ व ३७६ मधील शेतकरी मागील अनेक वर्षां पासून आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी लगतच्या गट क्र.२८८ मधील होळणा नदीच्या दक्षिण बाजूस असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्याचा बैलगाडी व शेतमाल वाहतुकीसाठी वापर करत होते.मात्र, काही महिन्यांपूर्वी गट क्र.२८८ चे शेतकरी मनिषा दिलीप वळसे व इतर यांनी या रस्त्यावर नारळाची रोपटी लावून तसेच लोखंडी तारांचे बेकायदेशीर कुंपण व गेट उभारून शेतकऱ्यांची वहीवाट पूर्णपणे बंद केली होती.त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीकाम, मशागत व शेतमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात अडचणीत आली होती.
न्यायालयीन लढा
या अन्यायाविरुद्ध अर्जदारॲड.श्रीनिवास कुलकर्णी,ॲड.सचिन कुलकर्णी,रत्नाकर भागोराम पन्हाळे व इतर शेतकऱ्यांनी अंबाजोगाई तहसीलदार न्यायालयात मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम ५ अन्वये रस्त्यावरील अडथळे दूर करून रस्ता खुला करण्या साठी अर्ज दाखल केला.दि.२० एप्रिल २०२६ रोजी प्रकरण दाखल करण्यात आले. प्रकरणात मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. त्यामध्ये रस्त्यावर बेकायदेशीर तारांचे कुंपण व लोखंडी गेट उभारल्याचे स्पष्ट झाले.
तहसीलदारांचा आदेश
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल आणि साक्षीदारांची शपथपत्रे विचारात घेऊन तहसीलदार विलास तरंगे साहेब यांनी अर्जदारांचा अर्ज मंजूर केला.दि.१ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशात गट क्र.२८८ मधील शेत रस्त्यावरील तारांचे कुंपण,लोखंडी गेट व इतर सर्व अडथळे तात्काळ दूर करून शेतरस्ता वहिवाटीसाठी खुला करून पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले.तसेच भविष्यात या रस्त्यावर प्रतिवादीने कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये, असेही प्रतिवादींना निर्देश देण्यात आले.
शासन निर्णयाचा आधार
महसूल व वन विभागाच्या दि.२२ मे २०२५रोजीच्या शासन निर्णयाचा आधार घेत आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर,रोटाव्हेटर, हार्वेस्टर यांसारखी कृषी अवजारे सहज जाऊ शकतील तसेच शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी पारंपरिक अरुंद रस्त्यां ऐवजी किमान ३ ते ४ मीटर (सुमारे १५ फूट) रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता या आदेशात अधोरेखित करण्यात आली आहे.
तसेच सदर शेत रस्त्याची नोंद अधिकृत पणे ७/१२ च्या ‘इतर हक्क’ सदरात घेण्याचे आदेशही ग्राम महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.दिनांक २४ जुलै २०२६ रोजी तहसीलदार अंबाजोगाई यांचे आदेश क्रमांक ५४६/ २०२६ यांच्या अंमलबजावणी अंतर्गत महसूल प्रशासनाने प्रत्यक्षपणे कारवाई करत शेत रस्त्यावरील लोखंडी ताराचे कुंपण काढून व इतर अडथळा दूर करून अतिक्रमित शेतरस्ता खुला केला.
यावेळी रत्नाकर भागोराम पन्हाळे,बाबू वली खा पठाण, देवानंद भगवान पाडुळे,अय्युब उस्मान खान पठाण,दत्ता साखरे, बळी घोरपडे, ॲड.शिरीषकुमार मुकडे,बाळासाहेब घोरपडे,मिलिंद बाळकृष्ण कुलकर्णी, विपिन विलासराव कुलकर्णी,खाजमिया पठाण,अमीन शेख, ज्ञानोबा सूर्यवंशी, गोविंद अण्णासाहेब जामदार,अशोक गोपीनाथ गाडवे, सुनील घोरपडे,मारुती सरवदे यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल तसेच तात्काळ प्रत्यक्ष कारवाई करून रस्ता खुला करून दिल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार विलास तरंगे साहेब, मंडळ अधिकारी भुसेवाड साहेब,तलाठी बनसोडे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.























