केज, प्रतिनिधी :
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय वर्षे ६ ते १६ या वयोगटातील बालस्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला तालुकाभरातून मोठा प्रतिसाद लाभला. एकूण ३६ स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या सुरेल आवाजाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
बालवयातच भजन, अभंग आणि वारकरी परंपरेची गोडी निर्माण व्हावी, तसेच नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रतिष्ठानने या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रत्येक स्पर्धकाने उत्कृष्ट सादरीकरण करून परीक्षकांसमोर आपल्या गायनकलेची छाप पाडली. त्यामुळे स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. शाश्वती उदय कुंभकर्ण तिने पटकावला तर स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश प्राप्त केले यामध्ये द्वितीय क्रमांक कु. सुनिष्ठा उमाकांत बोधणे, तर तृतीय क्रमांक चि. अगस्त्य अशोक सोनवणे याने पटकावला. तर आत्मजा अनिल रोडे तिने देखील उत्कृष्ट सादरीकरण केले कुमारी सुनिष्ठा उमाकांत बोधने हिने “घागर घेऊन” ही गवळण सादर केली तर अगस्त अशोक सोनवणे यांनी “कानडा राजा पंढरीचा” या अभंगांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले व आत्मजा रोडे हिने “धरीला पंढरीचा चोर” हा अभंग सादर केला. या विद्यार्थ्यांचे यश पाहून केज शहरातील नागरिकांकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.या
स्पर्धेसाठी प्रा. बालाजी मानगिरे (बीड) व प्रा. प्रसाद कुलकर्णी (जवळबन) यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे गायन, स्वर, ताल, उच्चार आणि भावसंपन्नता या निकषांवर परीक्षण केले. श्री. पवन चंदनशिव व श्री. पद्मनाभ देव यांच्या बहारदार साथीने कार्यक्रमाची रंगत अधिक खुलली.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे ह.भ.प. श्री. केशव महाराज शास्त्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी श्रीमती शोभा केजकर, श्री. शामराव काळे, श्री. संजय पोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने पालक व रसिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अभय कुंभकर्ण यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री कलोपासक प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांतजी देव यांनी सांगितले की, “वारकरी परंपरा, भक्ती आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्यासाठी तसेच बालकलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यातही अशाच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.”
ही स्पर्धा केवळ एक सांगीतिक स्पर्धा न ठरता, बालकलावंतांमधील भक्तीभाव, आत्मविश्वास आणि कलागुणांना वाव देणारा संस्मरणीय सांस्कृतिक सोहळा ठरला.























