शास्त्रीय संगीत सभा
कृष्णा बोंगाणे यांचे गायन
तुम बिन सूना सब संसार जगत के पालन हार
—————————————
४१ वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा स्वरमयी समारो
मराठवाड्याचं सांस्कृतिक पुणे असा उल्लेख अधिक दृढ करणारा समारोह म्हणजे प्रतिवर्षी संपन्न होणारा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह. अत्यंत कल्पकतेने कला,साहित्य, संगीत, कृषी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ रसिकांपर्यंत सर्वांची तृप्ती करणारा समारोह म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह ओळखला जातो. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवाप्रमाणे वर्षानुवर्ष नोव्हेंबर महिन्यातील २५ ते २७ या तारखेचे सातत्य राखणारा मराठवाड्यातील एकमेव समारोह.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी या समारोहामध्ये चित्रकला साहित्य कृषी अशा विविध विषयांवरील थोरामोठ्यांची व्याख्याने कार्यशाळा संपन्न झाल्या. दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक मनांच्या साम्राज्यावर हिंदोळे घेणारा सोबतीचा करार हा कार्यक्रम भरगच्च रसिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रतिवर्षी या समारोहाचा समारोप शास्त्रीय मैफिलीने होतो. यावर्षी या मैफिलीचे मानकरी होते जगविख्यात तबलावादक पंडित मुकेश जाधव आणि स्वर्गीय राशीद खान यांचे शिष्य पंडित कृष्णा बोंगाणे.
कृष्णा बोंगाणे यांचे गायन
पंडित मुकेश जाधव यांच्या स्वतंत्र तबला वादनानंतर उस्ताद राशीद खान यांचे शिष्य पंडित कृष्णा बोंगाणे यांचं व्यासपीठावर आगमन झालं. वयाच्या सातव्या वर्षापासून संगीत क्षेत्रात पदार्पण केलेल्या कृष्णा यांचे प्राथमिक शिक्षण कचेश्वर बोंगाणे व मराठवाड्याच्या संगीत क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय पंडित नाथराव नेरळकर यांच्याकडे झालं. कोलकाता येथे विख्यात गायक उस्ताद राशीद खान यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने त्यांनी तालीम घेतलेली आहे.
पंडित कृष्णा यांनी मैफिलीचा प्रारंभ राग सरस्वती मध्ये विलंबित एक तालातील रचना मोरे मन भाये जनम जनम चरणन दासी या बंदिशीने केला. पंडित कृष्णा यांचा खर्च जेवढा मजबूत तेवढाच मंद्र आणि तार सप्तकामध्ये सुद्धा स्वच्छ आणि स्पष्ट स्वर.. त्यामुळे रागाची स्पष्टता आणि स्वच्छ स्वरांची फेक रसिकांना अधिक भावते.
सरस्वती हा रागच एक गोड, आकर्षक आणि दक्षिणेकडील कर्नाटक संगीतातून हिंदुस्थानी संगीतात आलेला राग आहे. पंडित कृष्णा यांची रागाच्या स्वरूपाप्रमाणे पंचम-ऋषभ ही संगती आणि तीव्र मध्यम या स्वराचा प्रभावी वापर रसिकांना अधिक भावला.सरस्वती राग भक्तीमय आणि शांत वातावरण निर्माण करतो. ऐकणारे रसिक स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या एखाद्या पुरातन मंदिरात बसून आपण गाणं ऐकत आहोत की एखाद्या संगीत समारोहामध्ये हा भेदच हा राग ऐकताना विसरून जातात. त्यात कृष्णा यांनी अधून मधून कोमल निशादचा लिलया केलेला वापर रसिकांची वाहवा मिळवुन जात होता.
विलंबित एकतालातील बंदीशी नंतर त्यांनी तीनताल मध्यलयीमध्ये तुम बिन सुना सब संसार जगत के पालन हार ही बंदिश सादर केली. पंडित कृष्णा यांचे धीर गंभीर आलापी, बोल आलापी, जलद आलाप ताना यासोबतच नोटेशनसह जलद ताना यावरही प्रचंड प्रभुत्व आढळून आले.
राग सरस्वतीच्या सादरीकरणानंतर त्यांनी रसिकांच्या आग्रहास्तव सोहनी रागातील मध्यलय बंदिश देख देख मन ललचाई रे, रात सनद पिया सपने मे देखे सादर केली.
सरस्वती हा राग कल्याण थाटातील तर सोहनी हा राग मारवा थाटातील.
विशेष म्हणजे सोहनी हा उत्तरांग प्रधान राग असून सरस्वती रागाप्रमाणेच यामध्ये सुद्धा तीव्र मध्यमचा वापर केला जातो. मैफिलीची वाढत चाललेली वेळ आणि सोनी रागाची सादरीकरणाची वेळ याचा अचूक संगम पंडित कृष्णा यांनी गाठला होता. सरस्वती रागामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण करण्याची ताकद तर सोहनी रागामध्ये उत्कटता आणि शांतता अशा दोन्ही भावनांचा संगम. सरस्वती हा राग तीनही सप्तकामध्ये तितक्याच ताकतीने सादर करता येतो तर सोनी रागामध्ये अधिकाधिक तार सप्तकाचा वापर केला जातो. मुळातच उस्ताद राशीद खान यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने शिक्षण झाल्यामुळे पंडित कृष्णा यांनी दोन्ही रागातील स्पष्टता रसिकांच्या समोर अधिक स्वच्छतेने मांडली. सोनी रागातील मध्यालयीमध्ये बंदिश सादर केल्यानंतर त्यांनी तराना सादर केला. धारवाड येथील पंडित गणपती भट यांचा तराना ऐकल्यानंतर आपण इतर कुठल्याही गायकाचा तराना ऐकू नये अशी भावना रसिकांच्या मनामध्ये दृढ व्हायची परंतु पंडित कृष्णा यांनी रसिकांची ही समीकरणे आपल्या अत्यंत प्रभावी तयारीने मोडून काढली. तराना गाताना अत्यंत सफाईदारपणे लयकारी, दृत लईमध्ये तराण्यातील शब्दाचे स्पष्ट उच्चारण रसिकांच्या टाळ्या घेत होते.
अत्यंत तयारीने सादर केलेल्या तराण्यानंतर उपस्थित सर्व रसिकांच्या आग्रहस्तव भैरवी रागातील लई नाही लई नाही मागणे देवा हे भजन त्यांनी सादर करून सर्व रसिकांना भक्तीरसात ठेका धरायला लावला. पं. कृष्णा बोंगाणे यांची शास्त्रीय गायकीवर जेवढी मजबूत पकड आहे तेवढीच विविध संतांच्या रचना अर्थातच अभंगवाणीवरही आहे याची प्रचिती सर्व रसिकांना आली. त्यांना तबल्यावर आशय कुलकर्णी व संवादिनीवर अभिषेक शिनकर यांनी साथसंगत केली.
या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे वैशिष्ट्य म्हणजे भैरवी नंतर संयोजकांच्या वतीने व्यासपीठावर एकाही शब्दाचे उच्चारण केले जात नाही. प्रत्येक रसिकांनी प्रतिवर्षी भैरवीचे स्वर कानात साठवून आपापल्या घराकडे प्रस्थान करायचे हा रिवाजच जणू दृढ झाला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे कार्यवाह दगडू लोमटे यांच्यासह सर्व संयोजन समिती शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताच्या प्रचार प्रसारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत निष्ठेने परिश्रमपूर्वक प्रयत्न करत आहे याचे एक रसिक म्हणून निश्चितच कौतुक आणि अभिमान आहे. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणजे अंबाजोगाई हे वाक्य पुन्हा एकदा या संगीत समारोहाच्या निमित्ताने दृढ झालं..





















